Monday, May 12, 2008

भारतीय भित्तीपत्रकांचा जगप्रसिध्द अनमोल ठेवा - ’अजिंठा लेणी’



प्राचीन शैलग्रुहे व भित्तीचित्रे यांचे एक अप्रतिम जगप्रसिध्द स्थळ म्हणजे ’अजिंठा लेणी’ होय. फ़र्दापूरची लेणि असाही उल्लेख करण्यात येतो. बौध्द लेण्यांसाठी सुप्रसिध्द असे हे स्थान आहे. सह्याद्री पर्वताच्या सातमाळ रांगेतील इंध्याद्री शाखेत ही लेणी खोदलेली आहे. अजिंठा लेणी डोंगरांच्या एका रांगेत असून तिच्या समोर डोंगरांची दुसरी रांग आहे. डोंगराच्या एका कड्यावरून घाटमाथ्यावरचो पाणी खाली दरीत धबधब्याच्या रूपाने कोसळते आणि लेण्याच्या समोरून वाहत जाते. या जलप्रवाहाचीच पुढे वाघुर नदी तयार होते.


३० गुफ़ांची मालिका -


ज्या पहाडात लेणी खोदलेली आहेत, त्याची उंची सुमारे अडीचशे फ़ुटापर्यंत आहे. एकुण ३० बौध्द आहेत. त्यातील ४ चैत्यग्रुहे असून बाकीचे विहार आहेत. पूर्वी प्रत्येक गुंफ़ा स्वयंपूर्ण होती. प्रत्येक गुंफ़ेतुन खाली झर्यापर्यंत जाण्यासाठी पायर्या होत्या. आता त्या नष्टप्राय झाल्या आहेत.


चित्रकलेसाठी प्रसिध्द -


अजिंठ्याची लेणी वस्तुकला व मूर्तीकलेसाठी प्रसिध्द असली तरी चित्रकलेसाठी विशेष प्रसिध्द आहे. चित्रे काढण्यासाठी भिंतीवर प्रथम माती, शेण व दगडांची पूड एकत्र करून त्याचा लेप देऊन बनविण्यात आली आहे. छतासाठी भाताचा तूस किंवा ताग यांचा उपयोग केला आहे. त्यावर चुन्याचा हात मारून गेरूने प्रथम चित्रांची बाह्यरेषा रेखाटून त्यात रंग भरण्यात आले. चित्रकारांनी पांढरा, काळा, तांबडा, निळा, हिरवा, पिवळा या रंगांना विशेष प्राधान्य दिले आहे. विशिष्ट जातीची माणसे एका खास रंगानेच रंगविण्यात आली आहे.


स्त्रियांच्या चित्राक्रुती आकर्षक -


चित्रातील बहुतेक प्रसंग बुध्दांच्या कथांमधून निवडण्यात आले आहे. स्तंभ व छतांवर वेलबुट्टी अप्रतिम काढण्यात आली आहे. महिलांची चित्रे अतिशय सुंदर आहेत. गोरी व सावळी, कुमारीका व प्रौढा, आभूषण धारण केलेल्या स्त्रिया अप्रतिम आहे. विविध देवदेवता, यक्श, किन्नर, गंधर्व, अप्सरा यांचीही चित्रे साकारण्यात आली आहेत. पशू - पक्शींचाही त्यात समावेश आहे. काही लेणी अपूर्ण आहेत तर काही खराब झालेल्या आहेत.



इतर वैशिट्ये -


शिल्प व चित्र या द्रुष्टीने ही लेणी विशेष प्रेक्शणीय़ आहे. याशिवाय बुध्दाचा महापरिनिर्वाणाचा प्रसंग गुंफ़ा २६ मध्ये कोरलेला आहे. गौतम बुध्दाच्या मूर्तीची लांबी २३ फ़ूट असूनही मुद्रेवरील भाव सुरेख दिसतात. बुध्दाची मुद्रा शांत असून त्यांच्याजवळ असलेल्या सर्व शोकग्रस्त व्यक्तींच्या मुखावर दु:खाची छाया स्पष्ट दिसते.


प्राण्यांचे चित्रण -


एक नंबरच्या गुंफ़ेतील बैलांची झुंज प्रेक्शणीय़ आहे. याच गुंफ़ेत चार हरणांचे एक खास शिल्प आहे. एका चौकटीत २ उभी व २ बसलेली अशी चार हरणे आहे. पण या सगळ्यांना मिळून एकच तोंड आहे.


लेण्यातील बरीचशी चित्रकला आज अंधुक व अस्पष्ट होत आहे. या भित्तीचित्रांचे जतन करणे ही एक गंभीर समस्या बनत चालली आहे.